शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

देव

 आपण जास्त विचारशील माणसेच देवाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण करत राहतो आणि जीवनाच्या अंतापर्यंत हा प्रश्न बहुदा अनुत्तरीतच राहतो. आध्यात्मिक क्षेत्रात परमार्थ साधायचा असेल तर शंका-कुशंका आणि संशयाला मनात थारा द्यायचा नसतो. त्याने हाती काहीच लागत नाही आणि साधायचं असतं त्यातलं काहीच साध्य होत नाही. आपलं एकाच वेळी आस्तिक आणि नास्तिक असणं हे मला तितकंसं पटत नाही. ही दोलायमान अवस्था म्हणजे आस्तिकपणा किंवा नास्तिकपणाचा आपल्या-आपल्या सोयीने अर्थ काढल्यासारखे होईल किंवा आपल्यातील आस्तिकपणा किंवा नास्तिकपणा आपण मान्य करीत नसूही. मानला तर देव आहे, नाही मानला तर नाही. देव मनातच नाही तर बाहेर कसा दिसणार? ज्याला निर्गुण म्हणतो, त्याचे गुण शोधत राहतो. ज्याला निराकार म्हणतो, त्याचा आकार शोधत राहतो. ज्याचा चराचरात निवास, त्याला माझा-तुझा करत राहतो. 'घट-घट ते ब्रह्म निवासा' म्हणतो पण स्वतःमध्येही तो असावा हे मान्य करून घेत नाही. ज्याला खरा धर्म कळला असा माणूस मिळणे कठीण आणि त्याचे माणूस म्हणून राहणेही कठीण कारण खरा धर्म ज्याला कळला तो माणूसपणाच्या पलीकडे जातो असेही म्हणता येईल. धर्मात थोतांड आहे म्हणण्यापेक्षा ते माणसांत आहे असे म्हणता येईल.  आपल्याला जो परम आनंद देईल, मनाला जो समाधान देईल, ज्यात सर्वार्थाने सर्वांचं हीत होईल तो मार्ग चोखळलेला बरा! 


शेवटी कुणाचं अस्तित्व केवळ आपल्या मानण्या-न मानण्यावर कसं काय ठरू शकतं हाच मोठा प्रश्न आहे.. कुणी माना किंवा न माना, जे शाश्वत सत्य आहे ते बदलता येणार नाही. 

असो, माझ्या या मताशी इतरांनाही सहमत असावे असा आग्रह नाही. जे मनात आले त्या विचारांना वाट करून दिली एवढंच!!


मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

आठवणींच्या निमित्ताने

 आठवणींच्या निमित्ताने..

सोबतच्या माणसांबरोबरचे अनेक चांगले-वाईट अनुभव हे प्रत्येकाच्याच गाठीला आहेत पण म्हणून सर्वच गोष्टी या सोशल मीडियावर बोलायच्या नसतात, घरच्या गोष्टी या घरातच ठेवायच्या असतात. 'आठवणींतून' व्यक्त होताना सर्वच गोष्टी समोरच्याला सुखावतील असे नाही त्यामुळे ज्यांतून आपले ऋणानुबंध दृढ होतील अश्याच बाबींचा येथे ऊहापोह होणे हे इष्ट!! 

व्यक्त होत असताना आपण घेतलेल्या या शब्दांचा आधार मुळातच त्रोटक असतो.. आणि त्यात त्यातून निघणाऱ्या अर्थांबाबत कुणी काय बोलावे??  म्हणूनच हे शब्द वापरताना 'घाई तर होत नाही ना?' हे जरूर तपासावे. शब्दांत फार ताकद असते- त्यातून कधी कुणी सुखावलाही जाईल तर कुणी दुखावलाही जाईल! लिहिणाऱ्याचा हेतू कितीही स्वच्छ असला तरी पाहणाऱ्याच्या नजरेतून ते कसे दिसेल याचा नेमका अंदाज कुणालाही बांधता येणार नाही. आठवणींना पाहत असताना सर्वस्वी त्यांना आपल्याच नजरेतून पाहत असतो पण  त्याचवेळी त्याच आठवणी दुसऱ्यासाठी काही वेगळा अनुभव असतो. त्या-त्या प्रसंगाची भावनिक गुंफण मनामध्ये अगदी वेगवेगळ्या तऱ्हेने आपण करीत असतो. म्हणूनच अश्या आठवणींना सोशल मीडियाद्वारे उजाळा देताना कधीही काळजी घेतलेली बरी!!