सोमवार, २१ मे, २०१२

देव

देव

माणसांच्या खुर्‍याड्यात
देव नवा ठाकला आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
पैशाशिवाय काही चालत नाही
 नेहमीच  ऐकावं लागतं
पैशासाठी कधी स्वतःलाही
भर बाजारात विकावं लागतं
आज माणसांच्या बाजारात देवालाही भाव आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
        
आज नाती-गोती सगळीच
क्षणासाठीच असतात
पैसा नसला गाठीला की
ती ही क्षणभरात फिरतात
आज पैसा बघून आयुष्याची  जीवनगाठही जुळत आहे
 मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
पैसा नसतो सगळं म्हणून
रडतानाही पाहिलं
पैसा नसता जीवंतपणी
सडतानाही पाहिलं
आज चलनाविना दुबळे आम्ही जीवनही गहाण आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
ठाऊक आहे तुला-मला
भरपूर काही अनमोल आहे
हृदयाचा टाहो फुटला की
सर्वकाही फोल आहे
आज हृदय पिचून बघितलं सरणालाही किंमत आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
                                                                            - श्री अमर पवार

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा